बारामती ! खरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा(BBF)पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन
बारामती/सोमेश्वरनगर - यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी, पाण्याचा कार्यक्षम वापर व उत्पादनवाढीसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
रुंद सरी-वरंबा पद्धतीमध्ये साधारणपणे ९० ते १२० सेमी रुंदीचा वरंबा व १५ ते २० सें.मी. ची सरी तयार करून पेरणी केली जाते. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा जलद गतीने होतो. तसेच पावसात खंड पडल्यास सरींमध्ये साठलेल्या ओलाव्याचा पिकांना फायदा होतो. परिणामी मुळांची वाढ चांगली होऊन खतांचा कार्यक्षम वापर होतो व उत्पादनात वाढ होते.
सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, कापूस तसेच इतर खरीप पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त मानली जाते. जमिनीतील ओलावा संवर्धन, मृदा धूप नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापनासाठीही ती प्रभावी ठरते. याशिवाय आंतरमशागत, खत व्यवस्थापन व तण नियंत्रणाची कामे सुलभ होतात. मात्र अतिशय कोरड्या जमिनीत या पद्धतीने पेरणी टाळावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद सरी-वरंबा यंत्राचा वापर करून पेरणी करावी. हे यंत्र अनुदानित दरात उपलब्ध असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येतो.
अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



