सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवा नेते रवींद्र उर्फ सोन्याबापू शरदराव खोमणे यांची तर उपसरपंचपदी लता गजानन नलवडे यांची निवड झाली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामपंचायत म्हणून कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचा नावलौकिक आहे. ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशमामा खोमणे व सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुनील भगत या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत सतीशमामा खोमणे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने १५ जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. तुर सुनील भगत यांच्या सिद्धेश्वर ग्रामविकास गाव पॅनल ला अवघ्या चार जागा देत मतदारांनी साफ नाकारले. तर सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब माळशिकारे यांच्या काळेश्वरी पॅनलने तीन जागा लढवत तीनही जागा जिंकल्या होत्या.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग सोडत निघाली होती. त्यानंतर नव्याने झालेल्या सोडतीमध्ये पूर्वीचे आरक्षण कायम राहिल्याने रवींद्र खोमणे यांची सरपंच पदी निवड निश्चित मानली जात होती. सतीश मामा खोमणे यांनी गावातील सर्व लोकांना विचारात घेत सरपंच पदासाठी रवींद्र खोमणे यांचे तर उपसरपंचपदासाठी लता गजानन नलवडे यांचे नाव जाहीर केले. या नावांना भैरवनाथ पॅनलच्या सर्व लोकांनी व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. सरपंच पदासाठी रवींद्र खोमणे यांचा एकमेव अर्ज तर उपसरपंचपदासाठी लता नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोघांची निवड बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी रवींद्र पारधी यांनी कामकाज पाहिले.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर रवींद्र खोमणे यांनी पॅनल प्रमुख सतीश मामा खोमणे, डी.के. खोमणे तसेच पॅनल मधील सर्व प्रमुख, कार्यकर्ते, मतदार व ग्रामस्थ यांचे आभार मानून या पुढील काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. रवींद्र खोमणे यांच्या निवडीनंतर गावात एकच जल्लोष करण्यात आला.