सिनेस्टाईल थरार; महिला पोलीस अधिकाऱ्याने गाडीच्या दिशेने पिस्तुल रोखलं, पण…
पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील कामशेतमध्ये पोलीसांनी अज्ञात संशयित आरोपीला पकडण्यासाठी केलेला प्रयत्न सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद झालाय. अगदी सिनेस्टाईल सर्व घटना घडली,
त्याचे सी.सी.टी.व्ही. फूटेज समोर आले असून संबंधित व्यक्ती हे चोर होते की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ते कशासाठी आले हे देखील समजू शकलं नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी दिलीय. दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल कामशेतमधील दत्त कॉलनी येथे पहाटे तीनच्या सुमारास एक चारचाकी थांबली होती. या गाडीमधील व्यक्तींचा वावर संशयास्पद असल्याची माहिती कामशेत पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार, रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुरेख शिंदे या इतर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचल्या. संशयित चारचाकीच्या समोरच पोलीसांची गाडी थांबली. हे पाहून अज्ञातांनी आपलं चारचाकी वाहन काही क्षणात पाठीमागे घेतलं. तेव्हा पोलीस गाडीतून उतरले.पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी गाडीमधून उतरुन पिस्तुल काढून ते गाडीच्या दिशेने रोखलं.
तेवढ्यात संशयित व्यक्तीची मोटार त्यांना चकवा देऊन भरधाव वेगात निघून गेली.
पोलीसांच्या गाडीने देखील त्यांचा काही अंतरावर पाठलाग केला. परंतु, अज्ञात मोटार दिसेनाशी झाली आणि संशयित आरोपी फरार झाले. अद्याप, संबंधित संशयित व्यक्ती हे चोर होते की नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही. अनेकजण पोलिसांना पाहून घाबरून पळून जातात असं शिंदे यांनी सांगितलं.