मक्ताई हॉटेलवर काल झालेल्या हल्ल्यातील चार आरोपींवर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील मु पो सोरटेवाडी येथील असणाऱ्या मुक्ताई हॉटेलवर गुरुवारी दि १ रोजी रात्री चुकीच्या पद्धतीने धिंगाणा घालणाऱ्या चार जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनलकुमार उत्तम शेंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश उर्फ गोट्या जगन्नाथ भंडलकर (रा. मुरूम तवळवणीनगर, ता. बारामती), सोमा पवार, वैभव हनुमंत चव्हाण (दोन्ही रा. खामगाव साखरवाडी ता. फलटण जि. सातारा), रंजीत कैलास भंडलकर (रा. जिंती ता. फलटण जि. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्या चौघांची नावे आहेत. गुरुवार दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी हे आपल्या सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर पार्सल सुविधा देत असताना पार्सल चे पैसे मागितल्याच्या कारणावरून या चारही आरोपींनी फिर्यादीस दमदाटी करून फिर्यादीचे भाऊ विशाल यास सोमा पवार या आरोपीने कमरेला असलेल्या सत्तुर डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जखमी विशाल यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून सोनल कुमार शेंडकर यांनी दिलेल्या माहितीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी या चारही आरोपींवर भा द वि कलम 307, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल पोलीस निरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.