Type Here to Get Search Results !

इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

विशेष बातमी
                         
इतिहास संशोधन लेखनामध्ये ज्यांनी अनन्यसाधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीत वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे नाव घेता येईल. बेंद्रे यांची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. महाराष्ट्राचा 17 व्या शतकाचा इतिहास हे संशोधनाचे क्षेत्र बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले. 
        एक संग्राहक,साधनचिकित्सक,साधनसंपादक, संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका बेंद्रे यांनी समर्थपणे पार पाडल्या.सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड "साधन चिकित्सा"या नावाने  प्रसिद्ध झाला. सरकारी नोकरीत असून देखील ते इतिहास क्षेत्रात सतत कार्यमग्न राहिले .वि .का. राजवाडे यांना त्यांनी गुरुस्थानी माणून संशोधनाचे काम सुरू केले.
            इतिहास संशोधक बेंद्रे ह्यांचे आगाध कार्य, चिकाटी व इतिहासा विषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबाॅन यांच्या इच्छेनुसार श्री. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन वा. सी. बेंद्रे यांना सरकारी'" हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर" म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले.
            या दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन करून इंडिया हाऊस व ब्रिटिश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे पंचवीस खंड होतील एवढी सामुग्री बेंद्रे यांनी आपल्या देशात परत आणली. इंग्लंडमधील वास्तव्यामुळे बेंद्रे यांचे संशोधन- संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले.जेव्हा लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री बेंद्रे यांना संधी मिळाली तेव्हा अशी साधने तपासताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या व  महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला.
            इब्राहिम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकात छापले जात होते.संदर्भ हीन असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र समाजात पुजले जात होते.नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून सर्वत्र ज्याच्या छायाचित्राला मान्यता मिळाली ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच एकेकाळी आपल्या परदेश दौऱ्यातून हस्तगत केले होते.
             पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार करता ही नाटके बहुतांशी बखर वांग्मयाच्या आधारे,ऐकीव व परंपरागत चालत आलेल्या माहितीच्या आधारे  सजवलेली होती.छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली.त्यातील बहुतेक नाटकात छत्रपती संभाजी महाराजांना व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी ,असेच नाटककारांनी उभे केले होते. बेंद्रे यांना हे मुळीच पटत नव्हते.छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र संशोधित केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात बरेच दिवस घोळत होता.अनेक अडचणीवर मात करून, परदेशातही शोध घेऊन या विषयासंबंधीची  हजारो साधने त्यांनी एकत्रित केली,आणि त्यावर आधारित छत्रपती संभाजीमहाराजांचा चरित्रग्रंथ इ.स. 1958 मध्ये त्यांनी लिहून पूर्ण केला.म्हणजे त्यांनी सुमारे चाळीस वर्ष या विषयासाठी खर्ची घातली.
            या ग्रंथाने समाजात विलक्षण गोंधळ व खळबळ उडवून दिली .सन 1960 मध्ये "छत्रपतीं संभाजी महाराजांचे" खरे चरित्र वा .सी. बेंद्रे यांनी वाचकांसमोर प्रसिद्ध केले. या ग्रंथामुळे समाजात, महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात वा.सी.बेंद्रे यांचे नाव छत्रपती संभाजी  महाराजांवरील त्यांचे प्रदीर्घ संशोधन व छत्रपतीं संभाजी महाराजांची पारंपरिक प्रतिमा बदलून नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध झाले.
         या त्यांच्या लेखनाने छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच  बदलून गेली.पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची उंचावली गेली. वा. सी बेंद्रे यांच्या या ग्रंथामुळे छत्रपतीं संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलली गेली. या चारित्रा मुळे स्वाभिमानी, धर्मनिष्ठ ,पराक्रमी, संस्कृत जाणकार असे संभाजीराजांबद्दलचे  सत्य  लोकांपुढे उभे राहिले.वा.सी.बेंद्रे पुराव्याशिवाय काही लिहित नव्हते. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापुर मध्ये आहे असा समज होता. कालांतराने हा विषय संदर्भ मिळाल्यानंतर ही मूळ समाधी वढू- बुद्रुक येथे असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्या  ध्यानात आले.व अपार कष्ट करून त्यांनी अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला.
          बेंद्रे यांचे ध्येय ,जिद्द आणि धडपड आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील. दीर्घ आयुष्यात चौफेर वाचन व अखंड लेखन करण्याचे व्रत शेवट पर्यंत त्यांनी पाळले.वा.सी.बेंद्रे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र लिहून थांबले नाहीत तर, त्याच बरोबर बरेच संशोधन करून त्यांनी इतरही पुस्तके लिहिली. उदाहरणार्थ शहाजीराजे भोसले -मालोजीराजे भोसले .संभाजी राजे भोसले , छत्रपती राजाराम महाराज,आदिलशहा, कुतुबशहा ,आणि राजा जयसिंग. वा.सी. बेंद्रे यांनी या व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना व प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले.      
         शिवचरित्र लिहिण्यापूर्वी बेंद्रे यांनी 2 वर्ष इंग्लंडमध्ये व युरोपमध्ये वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोप मधील विविध म्युझियम मधील कागदपत्रांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे जहाजातून भारतात आणली. यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्य बाहेर येऊ शकली. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार 'जगदंब 'म्हणून ओळखली जात होती.नंतर या तलवारीचे नाव "भवानी" तलवार आहे हे वा.सी. बेंद्रे यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.वा.सी.बेंद्रे यांनी इतिहास संशोधन करून 60 च्यावर पुस्तके लिहिली. वयाच्या 80 व्या वर्षी 'राजाराम महाराज चरित्र 'हा ग्रंथ लिहिला. 

अशा या थोर इतिहास लेखकाला आमचा मानाचा मुजरा 

    लेखन  डाॅ.  सुवर्णा नाईक निंबाळकर ताई

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test