Type Here to Get Search Results !

BREAKING NEWS;कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचा  प्रादुर्भाव  आटोक्यात आणण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार
             
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

      बारामती दि. 17 :  बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा,  कोणत्याही परस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहुन योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. 
            बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती  रोहित कोकरे,  एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे,  अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,  गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई,  पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे,  शासकीयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
       बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना,  म्युकरमायकोसीस संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता,  आरोग्य सुविधा,  पॉझिटिव्हीटी रेट आदी  विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

        उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे.  कसल्याही परिस्थितीत  पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे गरजेचे आहे. कोरोना बधितांशी संपर्क वाढला की रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वार्ड निहाय सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे, त्यांचे विलगिकरण  होणे आवश्यक आहे. प्रशासनास  पूर्ण अधिकार दिले आहेत, स्थानिक पातळीवर प्रशासनाने त्याचा वापर करावा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.  तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे,  कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरावा,  सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी.असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
        उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
     या बैठकीपूर्वी  रॉबेल पॅक प्रा. लि. कुरुळी, पुणे यांच्याकडून  कोरोना रुग्णासाठी 10 कॉन्सेनट्रेटर देण्यात आले त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले. यावेळी कंपनीचे संचालक  सुब्रत बेहेरा व सुस्मिता बेहेरा,  प्रशासकीय  व वैद्यकीय अधिकरी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test