Type Here to Get Search Results !

पुण्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे: पुणे शहराची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून होण्यासाठी सर्वांनी मिळून सामुहीक प्रयत्न करावे. पुण्यातील रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. 
पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल ते फनटाईम थिएटर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचा भुमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री  गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनिल कांबळे, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 
  गडकरी म्हणाले, पुण्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोल ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी   शहराबाहेर नवीन शहरे विकसीत करणे आवश्यक आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलामुळे वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. या पुलावर डबल डेकर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढ्याच खर्चात वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल. पुणे- मुंबईसह राज्याला केंद्र सरकारकडून जेवढी मदत देता येईल तेवढी दिली जाईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे ही चांगली बाब आहे. पुण्यातील नदी प्रकल्प, रोप-वे व अन्य विकासाचे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी पुर्ण सहकार्य केले जाईल. 
पुणे- कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नगर या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर मेट्रो सुरू केल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासोबत वाहतूक अधिक गतीमान होईल. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडचाही विकास केला जाईल. राज्यातील विकासाचे जेवढे प्रकल्प सुरु आहेत त्यासाठी केंद्राकडून आवश्यक तो निधी व मदत देण्यात येईल. महाराष्ट्रात जास्तीत जास्त मार्गावर मेट्रो धावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे नागरिकांना कमी दरात प्रवासाची सुविधा मिळण्यासोबत पर्यावरणालाही फायदा होईल. 
नव्याने विकसित होत असलेला दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्ग जेएनपीटीपर्यंत जोडण्यात येणार आहे. राज्यातील केंद्र सरकारकडील प्रलंबित प्रश्नांबाबत‍ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधितांबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही  गडकरी यांनी यावेळी सांगितले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test