हरणीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांची शिवसेनेकडून महापूजा
रस्त्याची कामे करा, नाहीतर खुर्च्या खाली करा ...अशा जोरदार घोषणा देत शिवसेना कार्यकर्त्यांनी आज ( दि.१० ऑक्टोबर ) हरणी रस्त्यावर पडलेल्या खड्यांची चक्क महापूजा केली.यावेळी त्यांनी पुरंदरच्या आमदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने देखील खडे फोडल्याने या रस्त्यावरची रहदारी तात्पुरत्या स्वरुपात बंद झाली होती.
पुणे पंढरपूर पालखी महामार्गाला जोडणाऱ्या हरणी गावच्या अरुंद रस्त्यावर पावसामुळे खड्डेच खड्डे पडल्याने या रस्त्याची अक्षरशःचाळण झाली आहे .त्यातच रस्त्याच्या दुतर्फा बाजूस काटेरी झाडे देखील वाढली आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी स्वारांसह वाहन चालकांना खड्डे व काटेरी झाडे चुकवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मात्र या रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षापूर्वीच निधी मंजूर झाला असतानाही या रस्त्याची साधी मलमपट्टी होत नसल्याच्या कारणास्तव युवा सेनेचे अध्यक्ष सागर भुजबळ पुरंदर पंचायत समितीचे नीरा गण प्रमुख राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांनी हरणी रस्त्यावरील खड्यांची महापूजा करून संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी हरणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निखील यादव प्रगतशील शेतकरी बाळासाहेब राऊत यांसह धनंजय पवार तानाजी पवार आकाश चव्हाण निलेश भोसले सुशांत पवार गणेश यादव आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.