नीरा कोळविहिरे गटावर नेत्यांची करडी नजर
चौरंगी लढतीची शक्यता : राष्ट्रवादीतून बंडखोरी निश्चित.
पुरंदर प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या नीरा कोळविहिरे गट – गणात सध्या शिवसेनेचे प्राबल्य आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्याने मोर्चे बांधणी करत राष्ट्रवादी कॉंग्रस सह इंदिरा कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांनी या गटातील सूक्ष्म हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरवात केली असल्याची चर्चा आहे.
मागील जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी ने ओ.बो.सी.वर्गाला डावलून कुणबी पॅटर्न राबविल्याने व त्यातच गटा तटाचे राजकारण उफाळून आल्याने राष्ट्रवादीला चारही गटात पराभवाचा सामना करावा लागला होता .परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रावादीने विविध विकास कामांच्या जोरावर मोर्चे बांधणी करत ठिकठिकाणच्या गाव बैठकीवर जोर दिला आहे .
विशेषतः नीरा कोळविहीरे गटात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा,दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाठी भेटींसह जनसंपर्कावर जास्त भर दिल्याने पक्षीय संघटन निश्चितच मजबूत होणार आहे.त्यातच बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार अशोक टेकवडे यांचे सुपुत्र अजिंक्य टेकवडे यांनी देखील मोठ्या प्रमाणावर युवक वर्गाला संघटीत केल्याने पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे. परंतु आगामी निवडणुकीत या गट- गणातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली तरच राष्ट्रवादीचा विजय होऊ शकतो अन्यथा या पक्षातून मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची देखील बंडखोरी निश्चितपणे होऊ शकते अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई पवार यांनी महाराष्ट्राचे माजी जलसंपदा तथा जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून नीरा कोळ विहीरे गटात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा प्रसार तसेच गुंजवणीचे पाणी व पुरंदरच्या विकासाचे प्रवेशव्दार मानल्या जाणाऱ्या विमानतळाचा मुद्द्दा घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी या गटावर आपली पकड कायम ठेवली आहे.मात्र आगामी निवडणुकीत विशेषतः जिल्हा परिषदेसाठी ताकदीचा उमेदवार या पक्षाकडे असणे तितकेच गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
अशातच पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ विधी तज्ञ अॅड विजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने देखील या गटात ठिकठिकाणी जन संवाद बैठकीव्दारे पक्षाची मोर्चेबांधणी सुरु केली आहे.यामध्ये गटात सुरु असलेल्या विविध विकास कामांसह सामाजिक उपक्रम तसेच प्रास्ताविक कोट्यावधींची विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यावर कॉंग्रसच्या कार्यकर्त्यांनी भर दिला आहे .त्यातच एकिकडे आमदार संजय जगताप व प्रा.दिगंबर दुर्गाडे यांची राम लक्ष्मणाची जोडी असल्याचे या गटात मानले जात असल्याने आगामी निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी होणार कि दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच भा.ज.प.चे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या माध्यमातून देखील या गटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत.परंतु सध्याच्या परिस्थितीत इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरमाई ची भूमिका घेतली असल्याची उलट सुलट चर्चा नागरिकांमध्ये आहे.त्यातच आगामी काळात भाजप नव्याने राजकीय खेळी खेळणार का ?असाच सवाल सर्वसामान्य वर्गातून उपस्थित केला जात आहे.
त्यातच संपूर्ण घडामोडींचा विचार करता आगामी निवडणुकीचा कार्यक्रम व आरक्षणाचा मुद्दा जाहीर होण्यापूर्वीच या गटात तिकीट कोणाला मिळणार ? याची उत्सुकता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
अजितदादांचा गावभेट दौरा सन २००२ ते २०१७ पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या नीरा कोळ विहीरे गटात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा गाव भेट दौरा रविवार दि.१० ऑक्टोबर रोजी साय.५ च्या सुमारास वाल्हे या ठिकाणी होणार असल्याची माहिती येथील सरपंच अमोल खवले यांनी दिली .तर या दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जनतेशी थेट सवांद देखील साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गावभेट दौऱ्यात नेमक्या कोणत्या विषयावर जनतेशी संवाद साधणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे .