Type Here to Get Search Results !

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन
पुणे, दि. ३० नोव्हें.: जिल्ह्यात उंच असलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणा गडावर महावितरणकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचे उदघाटन  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

वेल्हे, भोर व मुळशी तालुक्यातील वाड्यावस्त्यांच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीमधून ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री  श्री. पवार यांनी यावेळी जाहीर केले.

  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  रणजीत शिवतरे,  महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता  राजेंद्र पवार आदी उपस्थित  होते.

वेल्हे तालुक्यामध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल १४०३ मीटर उंचीवर असलेला तोरणा गड सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्वाचा गड आहे. अतिदुर्गम व प्रचंड विस्तार असलेल्या तोरणा गडाचे विद्युतीकरण करण्यासाठी  जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. महावितरणकडून तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अत्यंत आव्हानात्मक व खडतर कामाला सुरवात करण्यात आली. यामध्ये उच्चदाबाच्या ११ केव्ही वाहिनीसाठी २७ वीजखांब तसेच लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले. यासोबतच १८०० मीटर लांबीची भूमिगत वीजवाहिनी दऱ्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तसेच १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. घाटमार्गाने, डोंगरदऱ्यातून ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी कर्मचाऱ्यांना खांद्यावर वीजखांब व इतर साहित्याची वाहतूक करावी लागली. या विद्युतीकरणामुळे तोरणा गडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांची सोय झाली असून पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.

तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अतिदुर्गम परिसर व दऱ्याडोंगरात वीजयंत्रणा उभारण्यासाठी मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता  माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे आदींसह अभियंता व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य  प्रवीण शिंदे, वेल्हे पंचायत समितीचे सभापती  दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य श दिनकर धरपाळे, पंचायत समिती सदस्य संगिता जेधे, वेल्हेचे सरपंच  संदीप नगिने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test