Type Here to Get Search Results !

प्रत्येक जिल्ह्यात संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देणार -अजित निंबाळकर

प्रत्येक जिल्ह्यात संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देणार -अजित निंबाळकर
पुणे दि.27- खाजगी क्षेत्रातही युवक-युवतींनी यशस्वी होण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले संगणक आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात देऊन सारथी संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळा आणि सारथी संस्थेतर्फे आयोजित संघ लोकसेवा आयोग परीक्षा-2020 यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच विद्यावाचस्पती पदवीधारकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाला माजी अपर मुख्य सचिव नानासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, संचालक उमाकांत दांगट, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते.

श्री.निंबाळकर म्हणाले, संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षेची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र शासकीय सेवेसोबत खाजगी क्षेत्रातही यश संपादन करण्याची युवकांची क्षमता आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी सारथीचे कार्य अधिक विस्तारण्याचे नियोजन आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

 संघ लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपण जनसेवक आहोत याची जाणिव ठेवीत संविधान आणि देशाविषयी निष्ठा बाळगून काम करावे. कायद्याचा अभ्यास करण्यासोबत लोकप्रतिनिधींचा सन्मानदेखील ठेवावा. त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करून घ्यावा. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठांसोबत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून मिळणारे प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

श्री.पाटील म्हणाले, युवकांनी ज्ञान, क्षमता आणि महत्वाकांक्षेच्या आधारे यश खेचून आणावे. त्यासाठी सारथी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा त्यांनी लाभ घ्यावा. शेती क्षेत्रातील अडचणी लक्षात घेता शिक्षणाच्या साह्याने इतर क्षेत्रात यश मिळविण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करावे. शिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू महाराज यांचा दृष्टीकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच युपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कमी कालावधीत विद्यावाचस्पती पदवी मिळविणाऱ्या  सारथीच्या छात्रवृत्तीधारकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षेतील यशात सारथी संस्थेचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात श्री.काकडे  म्हणाले, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सारथीचे 22 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. मराठा आणि कुणबी समाजातील 705 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी फेलोशिप देण्यात आली असून एका वर्षात 21 कोटी  वितरीत करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाला  सारथीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, पीएचडी मार्गदर्शक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test