श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोनामुळे आज सोमवारी साध्या पद्धतीने होणार साजरी,
सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील अखंड धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची यात्रा, धार्मिक पूजाअर्चा कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवार दि. ६ डिसेंबर रोजी देवाची मुख्य यात्रा आहे.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, ग्रामपंचायत मासाळवाडी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्यावतीने भाविकांना यावर्षीची श्री नायकोबा देवस्थान यात्रा व पालखी सोहळ्यास कोरोनाचे नियम पाळून धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे असे यावेळी सांगण्यात आले.
नायकोबा मंदिर परिसरात भाविकांनी यात्रेच्या दरम्यान गर्दी करू नये असेही आवाहन नायकोबा देवस्थान यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे. त्यास भाविकांनी सहकार्य करावे. श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून राज्याच्या विविध भागातून भाविक दरवर्षी याठिकाणी येत असतात.
देवाचा छबिना व आरती साध्या पद्धतीने, कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच भक्तांच्यात घ्यावी तसेच यंदा कोरोनामुळे बाकीचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, मासाळवाडी गावचे सरपंच, विविध पदाधिकारी, पोलिस पाटील व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला.