Type Here to Get Search Results !

बियाणे उत्पादनातून शेतकरी कंपनीने साधली आर्थिक प्रगती

बियाणे उत्पादनातून शेतकरी कंपनीने साधली आर्थिक प्रगती
बारामती - बारामती तालुक्यात माळेगाव बु. येथील प्रतिभा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने बियाणे उत्पादनाकडे लक्ष दिले आहे. कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली वेगळा प्रयोग केल्याने कंपनीचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा  लाभ झाला आहे. राजमा आणि सोयाबीन बियाणाच्या उत्पादनात कंपनीने चांगली प्रगती केली आहे. माळेगावच्या 3 किलोमीटर क्षेत्रातील 20 शेतकरी गटांनी एकत्रीत येऊन ही कंपनी स्थापीत केली. इतर 46 वैयक्तिक सभासद आहेत. कंपनीच्या कामासाठी अशोक तावरे यांनी स्वत:कडील 10 गुंठे जमीन भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पामधुन 13 लाख 50 हजाराचे अनुदान आणि प्रत्येक शेतकऱ्याकडून एक हजार याप्रमाणे साडेचार लाख रुपये स्वत:चा हिस्सा याप्रमाणे निधी उभारून युनिट उभे करण्यात आले. शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेऊन  एक किलोच्या पॅकींग पासून सुरूवात करण्यात आली. तळेगाव ढमढेरेचे मूळ निवासी असलेल्या लंडनस्थित आनंद मुळे यांनी राजमा उत्पादनाची कल्पना दिली. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर राजमाचे उत्पादन करण्यात आले. सातारा आणि उत्तर प्रदेशातून या वाणाला चांगली मागणी आली. तत्पूर्वी 50 टन हरभरा, 100 टन सोयाबीन आणि 5 टन ज्वारीवर प्रक्रीया करून कृषि विज्ञान केंद्र, बारामती प्रमाणिकरण करून घेत हे बियाणे बाजारात आणण्यात आले.सोयाबिनच्या बियाणाला परिसरातील कारखान्यांकडून मागणी आहे. कंपनीकडून हे बियाणे खरेदी करीत ते शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून 50 टक्के सवलीच्या दरात देण्यात येते. यवतमाळ, वाशिम, हिंगोली येथून देखील बियाणाला मागणी आहे. कंपनीने तयार केलेले हरभरा बियाणे ग्रेडींग आणि पॅकींग करून कर्नाटकात विकले जाते. युनिटच्या माध्यमातून ताशी 500 किलो बियाणे तयार करता येते. कंपनीने स्मार्ट प्रकल्पांतर्गत देखील प्रस्ताव सादर केला आहे. कृषि विभागामार्फत ‘विकेल ते पिकेल’ योजनेअंतर्गत बियाणे विक्रीसाठी सहकार्य करण्यात आले. अनुदानावर हरभरा विक्रीसाठी 2020 मध्ये 10 टन हरभरा आणि तेवढाच सोयाबीन कंपनीकडून घेण्यात आला. विक्री व्यवस्थेसाठी देखील कृषि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कोविड काळात अडचणी येऊनही कंपनीच्या सदस्यांनी उत्साहाने काम सुरू ठेवले आहे, त्यात त्यांना यशदेखील मिळाले आहे. कंपनीचा अधिक विस्तार करून बाहेरील राज्यात बियाणे विक्रीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. सदस्यांच्या शेतातही अधिक उत्पादन व्हावे यासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे. बदलत्या काळातील संधीचा विचार करून माळेगावच्या शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रयोगाचे यश लक्षात घेता तो इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. 
अशोक तावरे, अध्यक्ष- कंपनीच्या सभासदांच्या शेतात ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा  विचार आहे. आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी अवजार बँक स्थापित करावयाची आहे. त्यात सर्व यंत्र आधुनिक असतील. इच्छुकांना ती भाडेतत्वावर देता येतील. त्यामुळे उत्पादन वाढण्यासोबत कंपनीचे उत्पन्नही वाढेल.  
वैभव तांबे, उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती- प्रतिभा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने गेल्या दोन वर्षात चांगली प्रगती केली आहे. सोयाबीनचे चांगल्या प्रतीचे बियाणे कंपनीमार्फत उपलब्ध करून दिले जात असल्याने त्याला राज्याबाहेरूनही मागणी आहे. बियाणाचा दर्जा चांगला रहावा यासाठी कृषि विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र, बारामती मार्फत सातत्याने मार्गदर्शन केले जाते.                               
 डॉ. किरण मोघ जिल्हा माहिती अधिकारी, पुणे                                                                                                          

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test