बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत*
*बैलगाडा शर्यातींवरची बंदी उठवण्याचा निर्णय*
*शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा*
*बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे,*
*राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे*
*बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठीची लढाई लढणाऱ्या*
*सर्व नेते, कार्यकर्त्यांचं अभिनंदन व मनापासून आभार*
बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 16 :- “राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.