Type Here to Get Search Results !

पुणे ! 'सिम्बॉयोसिस'च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते.

पुणे ! 'सिम्बॉयोसिस'च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते. 
'सिम्बॉयोसिस’ सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन

विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी,नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे, दि.६: देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी  असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे 'सिम्बॉयोसिस'च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 'सिम्बॉयोसिस आरोग्य धाम'चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, 'सिम्बॉयोसिस'चे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. 

संस्थेत सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसोबतच जगातील ८५ देशातील विद्यार्थी शिकत असल्याचे समजून आनंद वाटल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, 'वसुधैव कुटुंबकम' या विचारधारेचे ही संस्था प्रतिनिधित्व करत आहे. संस्था भारताच्या प्राचीन वारशाचे आधुनिक रुपात जतन करत आहे ही आनंदाची बाब आहे. संस्थेचे विद्यार्थी अशा पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत ज्यांच्यापुढे अमर्याद संधी उपलब्ध आहेत. 

आपला देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून 'स्टार्टअप इकोसिस्टीम'चे जगातील तिसऱ्या क्रमांचाचे हब बनला आहे. ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्ट्रेंथन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ अशा मोहिमा विद्यार्थ्यांच्या आकांक्षाना मूर्त रूप देत आहेत. आजचा भारत नवे सृजन करत आहे, सुधारणा करत आहे तसेच पूर्ण विश्वाला प्रभावित करत आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले. 

*नवीन भारताच्या निर्माणाचे नेतृत्व युवा पिढीकडे*
कोरोना लसीच्या बाबतीत पूर्ण जगाला भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. युक्रेन संकटातही 'ऑपरेशन गंगा' राबवून भारताच्या नागरिकांना युद्धभूमीवरून सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देश अनेक क्षेत्रात ग्लोबल लीडर बनण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल उत्पादनामध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. देशात दोन मोठे संरक्षण कॉरिडॉर बनत आहेत जेथे आधुनिक शस्त्रास्त्रे देशाच्या संरक्षण गरजा भागवतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावात आपण नवीन भारताच्या निर्माणाकडे  वाटचाल करत असून याचे नेतृत्व युवा पीढीलाच करायचे आहे. 

सॉफ्टवेअर उद्योगापासून आरोग्य क्षेत्रापर्यंत, कृत्रिम बुद्धीमत्ता पासून ऑटोमोबाईल, क्वांटम कंम्युटिंग, मशीन लर्नींग, ड्रोन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, स्पेस टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रामध्ये सतत सुधारणा होत असून त्यामध्ये नवयुवकांसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अनेक क्षेत्रे युवकांसाठी सुरू होत असून आपण  या संधींचा युवकांनी लाभ घ्यावा. युवकांनी स्टार्टअप सुरु करावेत असे सांगून विद्यापीठातील युवकांच्या माध्यमातून देशासमोरील आव्हाने तसेच स्थानिक समस्यांवरील उपाययोजना समोर आल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. 

तंत्रज्ञान क्षेत्राचा अभ्यास करताना शेतकऱ्यांची मदत होऊ शकेल, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची मदत होऊ शकेल असे उत्पादन निर्माण करण्याचा विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात असल्यास आरोग्य क्षेत्र, गावातील आरोग्य सुविधा कशाप्रकारे मजबूत करता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे. 

*सिम्बॉयसीसने प्रत्येकवर्षी एक ‘थीम’ घेऊन काम करावे*
‘आरोग्य धाम’ हे पूर्ण देशासाठी एक मॉडेल म्हणून काम करु शकते. आपले ध्येय जेव्हा व्यक्तीगत ध्येयापासून देशाच्या ध्येयाकडे जातात तेव्हा राष्ट्रनिर्माणाची इच्छा वाढते. सिम्बॉयसिस संस्थेने यापुढे प्रत्येक वर्षी एक संकल्पना घेऊन त्यावर काम करावे, असे आवाहन करुन श्री. मोदी म्हणाले, ‘जागतिक हवामानबदल' अशी संकल्पना घेऊन चालू वर्षात काम केले जाऊ शकते. यामध्ये येथील सर्वजण वर्षभर योगदान देऊ शकतील.  त्याचा अभ्यास, संशोधन, जनजागृती, त्यास सामोरे जाण्यासाठी उत्पादने तयार करणे, किनारपट्टी क्षेत्रात तसेच सागरी क्षेत्रावरील परिणाम आदींवर काम करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे एक वर्ष ‘सीमा क्षेत्र’ ही संकल्पना घेऊन काम करता येऊ शकेल असेही त्यांनी सुचवले. 

डॉ. मुजुमदार यांनी स्वागतपर मनोगतात माहिती दिली की, जगातील ८५ देशातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. संस्थेने ग्रामीण भागातील युवकांना येथे शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण महागडे आहे ते परवडणारे कशा प्रकारे होईल त्याबाबत प्रयत्न झाले पाहिजेत. संस्था भारतीय परंपरेतील बुद्धीचातुर्य आणि परकीय देशांची सर्जनशीलता एकत्रित करुन पुढे जात आहे. 

प्रारंभी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते  'आरोग्य धाम' चे उद्घाटन करण्यात आले. तसेच सिम्बॉयोसिसच्या वाटचालीबाबत लघुचित्रफीत दाखवण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test