बारामती ! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप
बारामती, दि. १९ : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र आणि निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संतोष खामकर, गट विकास अधिकारी विजय कुमार परीट, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे, डॉ. क्षीरसागर, डॉ. हाके, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, अपंग बांधव, लाभार्थी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले, दिव्यांग आणि निराधार लोकांना त्यांच्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेला ५ टक्के निधीचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. स्वतःचे घर नससलेल्या दिव्यांग बांधवानी पंचायत समितीत नाव नोंदणी करावी. घरकुलापासून वंचित राहिलेल्या दिव्यांग बांधवांना घरकुलाचा लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, सरकारी कार्यालयात दिव्यांगांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत सर्वांनीच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने समाजातील दिव्यांग व निराधार लोकांच्या समस्या सोडवून त्यांना विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. अपंग आणि निराधार लोकांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही राज्यमंत्री भरणे यांनी केले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र आणि १० लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले. एकूण १७५ अपंग बांधवांना प्रमाणपत्र तर संजय गांधी निराधार योजनेच्या ५० लाभार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात आले.
00000