....उद्यापासून सकाळी शाळा भरणार शिक्षक संघाच्या मागणीस यश
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ एप्रिलपासून सकाळी भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाचे स्वागत केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
उन्हाचा चटका, पाणीटंचाई यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यांमध्ये सकाळी शाळा भरविल्या जातात. कोरोनामुळे अनेक दिवस शाळा बंद असल्याने यावर्षी शालेय कामकाजाच्या पूर्ण वेळ तासिका घेऊन शाळेची वेळ ठरविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
राज्यभर सकाळी शाळा भरविण्याचा निर्णय अन्य जिल्हा परिषदांनी घेतला असताना पुणे जिल्हा परिषदेने मात्र दिवसभर शाळा भरविण्याचा निर्णय घेतल्याने पालक व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. या वर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, अनेक शाळांना पत्र्याचे छत असून विज,पंखा, पिण्याचे पाणी या सुविधांचा अभाव असल्याने सकाळी शाळा भरविण्याची मागणी जिल्हा शिक्षक संघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्याकडे केली होती
सुधारित निर्णयामुळे आता पुणे जिल्ह्यातही सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा सकाळी ७:३० ते १२:५५ तर डोंगरी भागातील शाळा सकाळी ८ ते १:२५ या वेळेत भरणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली
वाढलेला उकाडा व ग्रामीण भागातील अडचणी लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सकाळच्या वेळेचा निर्णय घेतल्याने प्राथमिक शाळांना दिलासा मिळाला आहे मात्र दुपारच्या उन्हामुळे शाळेची वेळ दुपारी १२ पर्यंत ठेवावी !!
--- बाळासाहेब मारणे
जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे