बारामती ! ग्रामीण भागात जैवविविधता चित्ररथाचे आकर्षण
बारामती दि.३०-जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जैवविविधता जोपासण्याचा संदेश देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ ग्रामीण भागातील जनतेसाठी आकर्षण ठरत आहे. नागरिक उत्सुकतेने चित्ररथाला भेट देत माहिती जाणून घेत आहेत.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आणि सोमेश्वर नगर येथे चित्ररथाभोवती नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. काही तरुण चित्ररथाची छायाचित्रे आणि सेल्फीदेखील घेताना दिसले. चित्ररथावर वनवणवा नियंत्रणाविषयी माहिती देण्यात आली आहे. वणव्यामुळे जैवविविधतेचे होणारे नुकसानही प्रदर्शित करण्यात आले आहे.
वनक्षेत्र अधिक असलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांनादेखील या माध्यमातून पर्यावरण विषयक माहिती देण्यात येत आहे. चित्ररथावर प्रकाशाची योजना असल्याने रात्रीच्यावेळीदेखील ग्रामीण भागात संदेश देण्यात येत आहेत. सोमेश्वर नगर येथे सायंकाळी उशिरा नागरिकांनी चित्ररथ पाहण्यासाठी गर्दी केली होती. बारामती उप माहिती कार्यालयाचे माहिती सहायक रोहिदास गावडे यावेळी उपस्थित होते.
चित्ररथाला भेट देऊन खूप छान वाटले. एका माणसाची प्राण्यांविषयीची जबाबदारी काय असते ते मी अनुभवले. आपण झाडे तर लावलीच पाहिजे पण ती पूर्णपणे जपली पाहिजेत. पर्यावरण जपणे किती गरजेचे आहे ते या माध्यमातून समजले.
सुचिता जगन्नाथ साळवे, सोमेश्वरनगर –