मोठी बातमी ! जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान
पुणे, दि. 26: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 च्या अधिकारान्वये पोलीस अधिकाऱ्यांना अधिकारांचे प्रदान केले आहेत.
सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 9 मे 2022 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने कोणत्या वेळात काढव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व वेळा निश्चित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना असतील.
त्याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश्श वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकाऱ्यानी या अधिनियमांची कलमे क्र. 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे, हे अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत.