निरा भीमा कारखाना लवकरच टॉप टेन मध्ये - हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ -दि.२३/४/२२निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासूनच्या २१ वर्षांमध्ये प्रथमच विक्रमी ७ लाख ७ हजार ६७० में. टन ऊसाचे गाळप केले आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप केले असून, गाळपा अभावी एक टिपरू ऊस शिल्लक राहिलेली नाही. सध्या कारखान्याची वाटचाल प्रगतीपथाकडे सुरू असल्याने निरा भीमा कारखाना हा आगामी एक-दोन वर्षात राज्यात पहिल्या टॉप टेन मध्ये निश्चितपणे येईल, असे गौरवोदगार कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
शहाजीनगर येथे नीरा भीमा सहकारी कारखान्यावरती संस्थापक चेअरमन हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने विक्रमी गाळपाबद्दल शनिवारी (दि. २३ ) कर्मचारी व वाहतूकदारांसाठी स्नेहमेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, कारखान्याच्या चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामाची दि.९ एप्रिल रोजी सांगता झाली. या हंगामात ऊस गळपासह इतर उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पामध्येही कारखान्याने विक्रमी उत्पादन घेतले आहे. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊंचा विचार तालुक्यामध्ये अभेद्य आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना व नीरा-भीमा कारखान्याने मिळून सुमारे १८ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. परिणामी कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा पुढील वर्षी ८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल, असे सांगितले.
प्रास्ताविक यावेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर संचालकपदी बिनविरोध निवड झालेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच
प्रतिनिधी स्वरूपात ७ वाहतूकदार, ७ कर्मचारी यांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार तसेच तोडणी वाहतूकदार, कर्मचारी उपस्थित होते. टीकेला एकच उत्तर सन २०२४- हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याचा चुकीच्या लोकप्रतिनिधी मुळे सर्वांगीण विकास थांबला आहे, परिणामी तालुक्याचे सर्वच क्षेत्रात मोठे नुकसान होत आहे. स्वतःचे अपयश झाकणेसाठी विरोधक सध्या हर्षवर्धन पाटील यांचे वर अशोभनीय शब्दात टीका करीत आहे. या 'टीकेला एकच उत्तर सन २०२४ ' असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांची आठवण नीरा भीमा कारखाना उभारणीसाठी राज्यात १२५० मेट्रिक टन क्षमतेच्या कारखानदारीचे धोरण आणणे व नीरा भीमास कर्जपुरवठा करणे संदर्भात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी कायम सहकार्य केल्याची आठवण हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली. तसेच सध्या केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व सहकार्य मिळत असल्याचा उल्लेख भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला. तालुक्यातील सहकारी संस्था मजबूत- हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा-भीमा हे दोन्ही साखर कारखाने उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत. तसेच इंदापूर अर्बन बँकेस एनपीएच्या चांगल्या कामगिरीबद्दल शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. तसेच दूधगंगा सहकारी दुध संघाची प्रगती वेगात चालू असून, अमूल च्या सहकार्याने आगामी काळात १ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील शिक्षण संस्था व इतरही संस्था चांगल्या चालत असल्याने त्याचा फायदा तालुक्यातील जनतेला होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले.