अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन
पुणे दि.२५: जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टल मार्फत देण्यात येतो. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत २०२१-२२ साठी ३९ हजार ८२६ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जाची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
अद्यापपर्यंत महाविद्यालय स्तरावर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ५ हजार ३८५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्याने अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची राहणार आहे. संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.