पुणे ! समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती व संस्थांना अर्ज सादर करण्याचे आवाहन
पुणे,दि.०६ - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९- २०२०, २०२०-२०२१ व २०२१-२०२२ आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती अथवा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज सबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्याकडे १५ मे २०२२ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे.
अर्जाचा नमुना विभागातील सर्व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर पुरस्काराची माहिती शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यात समाजसेवक व्यक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार आदी पुरस्कार व्यक्ती व संस्था देण्यात येणार आहे. तसेच संस्थांसाठी शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक हा मानाचा पुरस्कार सहा महसूल विभागातील प्रत्येकी २ याप्रामाणे १२ संस्थाना देण्यात येणार आहे. रुपये ७.५० लक्ष, सन्मापत्र, मानपत्रासाठी चादीचा स्र्कोल, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरुप आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय “ प्राविण्य” पुरस्कारदेखील संस्थाना दिला जाणार आहे. हा पुरस्कार राज्यस्तीय असुन प्रथम ५ लक्ष, द्वितीय ३ लक्ष, तृतीय २ लक्ष तसेच उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस १ लक्ष रुपये देण्यात येणार आहे.
सन २०१९-२० या कालावधीत ज्या अर्जदारांनी अर्ज केला आहे. त्यांनी या कालावधीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.