सिंबायोसिस विद्यापीठाची दर्जेदार शिक्षणासाठी ओळख-आरोग्य मंत्री राजेश टोपे
पुणे दि.१०-सिंबायोसिस विद्यापीठाने काळानुरूप अभ्यासक्रमातील अनुकूल बदल आणि परिश्रमाच्या बळावर दर्जेदार शिक्षणाचा ‘ब्रँड’ तयार केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री राजेश टोपे यांनी केले.
सिंबायोसिस विद्यापीठाच्या १५ वा वर्धापन दिन आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक डॉ. शां.ब.मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ.अश्विनी कुमार आदी उपस्थित होते.
श्री.टोपे म्हणाले, दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक अभ्यासक्रमासह अनेक महत्वाच्या बाबी विद्यापीठाने मुर्तरुपात आणल्या. उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर आणि ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत राहण्यामुळे विद्यापीठाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अध्यापनासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर, सातत्याने मूल्यांकन प्रक्रीया राबविणे, पात्र कर्मचारी वर्ग तयार करणे अशा बाबींमुळे विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती साधली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत शैक्षणिक क्षितीजात संस्था अधिक जोमाने प्रगती साधत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.स्वाती मुजुमदार म्हणाल्या, सिंबायोसिस कम्युनिटी महाविद्यालयामार्फत सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये गृहीणी, तरुण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येते. तसेच अल्पकालिन अभ्यासक्रमदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अलिकडेच सिंबायोसिस सेंटर फॉर ऑनलाईन लर्निंगची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राद्वारके मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी खर्चात ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.