...त्या गावातील शाळा प्रशासन व ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात पुष्पगुच्छ देत विद्यार्थ्यांचे केले जोरदार स्वागत.
मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव केंद्रांतर्गत समावेश असलेल्या पाटील बुवा मळा जिल्हा परिषद शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी बुधवार दि 15 जून रोजी शाळा प्रशासन व ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन शालेय विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागताने बाल चमूने मोठा आनंद व्यक्त केला तर उपस्थितांनी भावनाविवश होऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
सुट्टी संपली, शाळा सुरू झाली आज शाळेचा पहिला दिवस, नवा वर्ग, नवे मित्र, नवे कपडे, सर्व काही नवे नवे त्यातच शाळा प्रशासनाकङून ढोल-ताशांचा गजर व पुष्प गुच्छाने स्वागत झाल्याने कोरोना नंतर दोन वर्षाने पहिल्यांदाच सुरू झालेल्या मोरगाव ता बारामती येथील पाटील बुवा मळा जिल्हा परिषद शाळेतील हे चित्र मनास आनंदित करीत होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील तावरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या औक्षण व स्वागताची पूर्व जोरदार तयारी करण्यात आली होती.
सकाळी शाळा भरण्यापूर्वी संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तसेच शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांच्या वतीने लहान पहिलीतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देत शाळा प्रवेश करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय समगिर यांनी चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली.तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश देण्यात आला .
यावेळी हरिभाऊ तावरे, सुनील तावरे, राहुल तावरे, आण्णासो तावरे, संजय तावरे, भाग्यश्री तावरे, सोनाली तावरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दत्तात्रय समगिर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपशिक्षिका विद्या जगताप यांनी मानले.
छायाचित्र : मोरगाव ता बारामती येथील पाटील पाटील बुवा मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना ग्रामस्थ.