शहादा नगरीत श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरीत येत्या १ जुलैला श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात येणार असल्याची माहिती श्री जगन्नाथ नारायणपूरम तीर्थ देवसंस्थान ट्रस्टचे लोकेश आनंदजी महाराज यांनी दिली.
दरवर्षी नारायण भक्ती पंथाच्या अनुयायांकडून शहादा शहरातून श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या जल्लोषात काढली जाते .परंतु कोरोनाच्या काळात सरकारने दिलेल्या सूचनेनुसार गेल्या दोन वर्षापासून श्री जगन्नाथांची रथयात्रा बंद होती.
मात्र सरकारी नियम शिथिल झाल्याने यावर्षी श्री जगन्नाथांची रथयात्रा येत्या १ जुलैला काढली जाणार आहे.या रथयात्रेची सुरवात शहादा शहरातील प्रेस मारुती मंदिरापासून होणार आहे .दरम्यान नगर प्रदक्षिणा झाल्यावर डोंगरगाव रोड दादावाडी परिसरात या रथयात्रेची सांगता होणार आहे.
यावेळी रथयात्रेला अनेक राज्यातून भाविक हजेरी लावणार असून नागरिकांनी देखील या आनंदोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायण भक्ती पंथाच्या अनुयायी अॅड.पल्लवी प्रकाशकर यांनी केले.