Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार

महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार

राज्याला 2 कोटींची प्रोत्साहनपर रक्कम
            
नवी दिल्ली  : खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच राज्याला २ कोटी ७ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची  प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आली.

        केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ६व्या  खाण व खनिज संमेलनात हे पुरस्कार व प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आली. यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विभागाचे सचिव आलोक टंडन उपस्थित होते.

राज्याला १ कोटीचा राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार

            या समारंभात वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ करिता एकूण तीन श्रेणींमध्ये प्रत्येकी ३ राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. खनिज श्रेणीत महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. १ कोटी रुपये रोख, चषक आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

२ कोटी ७ लाखांची प्रोत्साहनपर रक्कम

         वर्ष २०२०-२०२१ दरम्यान खनिज ब्लॉकच्या यशस्वी लिलावासाठी देशातील १० राज्यांना या समारंभात मंत्री श्री. शाह यांच्या हस्ते आज प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रालाही या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी २ कोटी ७ लाख ३४ हजार आणि ३७५ रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आली. राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी ही रक्कम स्वीकारली.

महाराष्ट्राला ५ खनिज ब्लॉक हस्तांतरित

            भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने प्राथमिक खनिज शोध लावलेल्या महाराष्ट्रातील ५ ब्लॉकचेही यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री श्री. दानवे यांच्या हस्ते राज्याला हस्तांतरण करण्यात आले. भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हे एकूण ५ ब्लॉक हस्तांतरित करण्यात आले. या हस्तांरणानंतर राज्य शासनाला संबंधित ब्लॉकचा लिलाव करून अधिक खनिज सर्वेक्षण करता येऊ शकेल.   

राज्यातील ६ पंचतारांकित खाणिंनाही पुरस्कार

           या समारंभात केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री श्री. जोशी आणि राज्यमंत्री श्री. दानवे यांच्या हस्ते देशातील ४० खाणिंना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील ६ खाणिंचा यात समावेश आहे. यात भंडारा जिल्ह्यातील चिकला मँगनीज खाण, गोंदिया जिल्ह्यातील धोबीतोला लोखंड खनिज खाण, नागपूर जिल्ह्यातील गुमगांव आणि कांद्री मँगनीज या दोन खाणी, चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड आणि नावकरी या दोन चुनखडी  खाणिंना गौरविण्यात आले. या खाणिंच्या व्यवस्थापनविषयक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  हे पुरस्कार स्वीकारले.                             

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test