Type Here to Get Search Results !

आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे -भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या सुचनेनुसार गेल्या दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेल्या परंतू  माहिती अद्ययावत  न झालेल्या आधार अद्ययावतीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्याची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार असून नागरिकांनी आधार पत्रिकेवरील माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणीशी संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक पांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, बीएसएनएलचे विक्री व व्यवस्थापन जिल्हा महाव्यवस्थापक सतिश आळंदकर आदी उपस्थित होते.

सर्व संबंधितांना हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांना आधार अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत आधार ऑपरेटर्सची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आधार पत्रिका हे विविध कामांमध्ये ओळखीसाठी महत्वाचे दस्तावेज म्हणून उपयोगात आणले जाते. अनेक शासकीय सेवा व सुविधांसाठीदेखील आधार पत्रिकेचा उपयोग करण्यात येतो. बऱ्याचदा आधार पत्रिकेवर नमूद पत्ता बदल झाल्याने तो अद्ययावत करण्याची आवश्यकता असते. नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधार पत्रिकेवरील तपशीलात  बदल करू शकतात.

युएआयडीएआयने ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा तयार केली असून ‘माय आधार’ पोर्टलवर ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरदेखील माहिती अद्ययावत करता येणार आहे. आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरुपाचे आहे.  देशातील ४० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षात आधार अद्ययावतीकरण न केलेल्या नागरिकांनी आधार अद्ययावत करून घ्यावे आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test