सोमेश्वरनगर - घरी मुबलक खायला असूनही आई वडील बाहेरून आले तर आई बाबा,आम्हाला खाऊ काय आणला?असा हमखास प्रश्न असतो. पण माझ्या शाळेतील अनाथ, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीतील मुला मुलींना ह्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सावंत यांनी घातलेल्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत बारामती रोटरी क्लबच्या दर्शना गुजर यांनी तात्काळ प्रतिसाद देत मुलांच्या पोषणासाठी आर्थिक मदत केली.
समाजातील चांगुलपणावर आपला समाज तरलेला आहे. आणि हाच चांगुलपणा गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्या रोहिणी सावंत यांनी केले. आपली छोटीशी मदत वंचित समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवू शकते. प्राचार्या रोहिणी सावंत यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दर्शना गुजर यांनी केलेल्या मदतीचे आज मुलांना केळी वाटप करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. यावेळी श बाळू मोटे यांनी दर्शना गुजर यांचे आभार मानले. आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.