दुःख घटना ! काऱ्हाटी येथे २० वर्षीय तरुणाचा कऱ्हा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू
बारामती : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे २० वर्षीय तरुणाचा कऱ्हा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शुभम संतोष खंडागळे असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा आपली आई जयश्री खंडागळे यांच्यासोबत गोधडी धुण्यासाठी नदीवर गेला होता. गोधडी धुतल्यानंतर मित्रासोबत पोहण्याचा मोह शुभमला आवरता आला नाही. त्यामुळे पोहण्यासाठी तो कऱ्हा नदीपात्रातील बंधाऱ्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्यानंतर नदीपात्राशेजारी असणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र पाण्यातून बाहेर काढेपर्यंत शुभमचा बुडून मृत्यू झाला.
शुभम हा सातारा येथे पोलीस भरती अॅकॅडमीत शिक्षण घेत होता. सुट्टी असल्याने तो काऱ्हाटी या त्याच्या मूळ गावी आला होता. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शुभम विषयी हळहळ व्यक्त होत आहे.