चोपडज शाळेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊवाटप व वृक्षारोपण
फोटोओळी : चोपडज शाळेत छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊवाटप करताना समता परिषदेचे पदाधिकारी.
बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील चोपडज याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊवाटप, वृक्षारोपण तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा शाळेस भेट देण्यात आली.
चोपडज येथील अखिल भारतीय समता परिषदेचे पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष यादव यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर अखिल भारतीय समता परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख किशोर वचकल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संतोष यादव यांच्या वतीने प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात लावण्यासाठी झाडे देण्यात आली. शाळेस महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा तसेच मान्यवर व शिक्षकांना महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्राचा कालपट असलेले कॅलेंडर भेट देण्यात आले.
याप्रसंगी संतोष यादव व अनिल लडकत यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जीवनाविषयीची माहिती शिक्षक, विद्यार्थी व उपस्थितांना दिली.
यावेळी पत्रकार काशिनाथ पिंगळे,शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब फडतरे, शिक्षिका दिपाली पंडित, अलका माने व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते.