पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ५६० उमेदवारांची निवड
पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह अंतर्गत नौरोसजी वाडिया कॉलेज पुणे येथे आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी मुलाखतीद्वारे ५६० बेरोजगार उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड केली.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नौरासजी वाडिया कॉलेज आणि नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, टॅलेंटकॉर्प सोल्युशन प्रा.लि.,पुणे आणि भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस असोसिएशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महारोजगार मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ.मनोहर सानप, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सा. बा. मोहिते आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील उद्योजकांशी समन्वय साधून बेरोजगार उमेदवारांना रोजगारांची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यामध्ये ६ हजार ६४६ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३४ उद्योजकांनी सहभाग नोंदविला.मेळाव्यात १ हजार ११३ उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहिले. त्यापैकी सुमारे ५६० बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला नौरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ.फरहान सुर्वे, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर यांचे सहकार्य लाभले.