सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्याचा निर्णय प्रादेशिक सह संचालकांनी फेटाळला - सतिश काकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दि. २९ रोजी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यातील अर्जेंठा (पुरवणी) वरील विषय क.१ नुसार पोटनियमातुन गावे कमी करण्याचा राजकीय हेतुने सभासदांची इच्छा नसताना बळजबरीने सभासदत्वासह माळेगाव कारखान्याला गावे जोडण्याचा प्रयत्न चेअरमन व संचालक मंडळाने केला. सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यास सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत परवानगी दिलेली नसताना खोटे प्रोसिडींग लिहुन फक्त नेत्यांना खुश करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याने दि.०३ रोजी सदर १० गावेमाळेगाव कारखान्यास जोडण्यात यावीत यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर शेतकरी कृती समितीने मा.साखर आयुक्त यांना सोमेश्वर कारखान्याची ही १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्यात येवु नये यासाठी त्या १० गावातील सभासदांच्या सह्या घेवुन सदर अर्ज दि.१३ रोजी मा.साखर आयुक्त कार्यालयात.दाखल केला. त्यामध्ये कारखान्याचे आज विस्तारीकरण झाले असुन गाळप क्षमता वाढली आहे. सदर विस्तारवाढ करण्यासाठी वित्तीय बँकांची कोट्यावधी रूपयांची कर्जे घेतलेली आहेत. पोटनियमातील सर्व गावांच्या उसाचे गाळप गृहीत धरून कारखान्याने विस्तारवाढ केलेली आहे आणि आज ही गावे कमी केल्यानंतर कारखान्यास पुरेसा उस मिळणार नाही त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या पोटनियमातुन सदर गावे कमी करण्यात येवु नये. माळेगाव कारखान्याची स्थापना सोमेश्वर कारखान्याच्या आधी कित्येक वर्ष झालेली आहे. त्यावेळी मात्र त्या कारखान्याने ही गावे घेतली नव्हती मग ६० वर्षांनंतर ही गावे घेण्याचे व देण्याचे कारण काय ? जर आज ही १० गावे सोमेश्वर कारखान्याच्या पोटनियमातुन कमी करून माळेगाव कारखान्यास जोडली तर नंतर इतर गावेही आम्हाला दुसऱ्या कारखान्यास जोडण्यात यावे अशी मागणी करू शकतात हे मुद्दे कृती समितीने मांडले होते. त्यावर मा. प्रादेशिक सह संचालक यांनी २५ ऑक्टोंबर रोजी सोमेश्वर कारखान्याकडुन १० गावे माळेगाव कारखान्यास जोडणेसंदर्भात देण्यात आलेला प्रस्ताव नामंजुर केलेले आहे..वास्तविक नेते व चेअरमन यांना माळेगाव कारखान्याची एवढीच जर काळजी होती तर त्यांना लाटे,शिरीष्णे, कुरणेवाडी, कोऱ्हाळे खुर्द व कोऱ्हाळे बु॥ ही गावे देतो असे का म्हणाले नाहीत. किंवा छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती तालुक्यामध्ये येत असलेले दोन्ही गट माळेगाव कारखान्यास जोडण्यासाठी का दिले नाहीत याचा विचार नेत्यांनी व चेअरमन यांनी का केला नाही. हे केवळ राजकारणासाठी व भविष्यात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कधीही त्रास होवु नये म्हणुन केलेला डाव होता. परंतु त्यामुळे भविष्यात सोमेश्वर कारखाना आर्थिक अडचणीत गेला असता म्हणुन कृती समितीने हा डाव हाणुन पाडला आहे. तसेच चेअरमन यांनी नेत्यांना खुश करून पुढील काही वर्ष चेअरमन पद वाढवुन मिळावे यासाठी सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्यात यावी यासाठी साखर आयुक्त कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.त्यावर साखर आयुक्त कार्यालयाने तात्काळ निर्णय द्यावा यासाठी त्या १० गावातील काही ठरावीक सभासदांना हाताशी धरून चेअरमन यांनी मा. हायकोर्टात जनहित याचिका सुध्दा दाखल केली होती व त्यासाठी नामांकित.वकीलाची नेमणुक करून त्याची फी देखील सोमेश्वर कारखान्याने दिली असल्याची खात्रीशिर माहिती मिळत आहे. तरी यापुढे चेअरमन यांनी कारखान्याच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावेत नेते मंडळींना खुश करण्यासाठी कारखान्याच्या विरोधी निर्णय घेवु नयेत अशी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.