जिल्हास्तरावर युवा गटांच्या कार्यशाळेचे आयोजन
पुणे : ‘समता पर्व’ कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर ‘युवा गटांची कार्यशाळा’ तसेच स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ‘उद्योजकता विकास’ या कार्यक्रमांचे आयोजन आयोजन करण्यात आले.
दिनांक २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत समाज कल्याण विभागामार्फत राज्यभरात ‘समता पर्व’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आयोजित या कार्यशाळेस समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगिता डावखर, खादी ग्रामोद्योग संचालक अमर राऊत, एमसीईडीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक रोहन मोरे आदी उपस्थित होते.
संचालक अमर राऊत यांनी शासकीय योजनांचा लाभ बँकांमार्फत घेण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उद्योग उभारण्यासाठी शासनामार्फत मिळणारे अनुदान हे उद्योजकाने आपल्या उद्योगाच्या माध्यमातून बेरोजगारी नष्ट करण्याच्या कामाचा मोबदला होय. पुरुषांप्रमाणेच महिलांनीही उद्योग उभारणीत पुढाकार घेणे सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित आहे.
स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत समाज कल्याण पुणे मार्फत १७ उद्योजकांना मनीमार्जिन अंतर्गत लाभ मिळवून दिला असून २०२२-२३ मध्ये किमान २० ते ३० उद्योजकांना घडवण्याचे ध्येय विभागाने ठेवले असल्याचे श्रीमती डावकर यांनी सांगितले. नव उद्योजकांनी भौगोलिक परिस्थितीनुसार व्यवसाय निवडून व्यवसाय सुरू करावा असे आवाहन त्यांनी केले.
श्री. मोरे यांनी नाबार्ड तर्फे ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येत असलेल्या एग्रीकल्चर क्लीनिक अँड एग्रीकल्चर बिझनेस या योजनेची माहिती दिली. या योजनेबाबत कृषी विज्ञान केंद्र बारामती व नारायणगाव येथे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असून शेती विषयक लघुउद्योग व मध्यम उद्योग करण्यास सहाय्यक असलेल्या या योजनेचा तसेच मुद्रा योजना, पशुसंवर्धन बाबत योजना बचत गटांमार्फत राबवण्यात येणारे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
बार्टीच्या समतादूत प्रकल्प अधिकारी श्रीमती शीतल बंडगर यांनी माहिती दिली, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते ४५ वयोगटातील युवक युवतींचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास होण्याच्या दृष्टीने स्वयंसहायता युवा गट तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत १२८ युवा गटांची स्थापना करून १३ प्रशिक्षणाचे कार्यक्रमांचे पूर्ण करण्यात आले असून काही गटांमार्फत उद्योग सुरु झाले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र विश्रांतवाडी शाखेच्या व्यवस्थापक श्रीमती मालिनी हसंदा म्हणाल्या, कर्ज प्रकरण मंजूर करताना बँकेला विविध निकषांचा विचार करावा लागतो. त्यामुळे अर्थसहाय्य मिळण्यासाठी लाभार्थ्याने आपले प्रकल्प व त्याबाबतचे कर्ज प्रकरण अभ्यासपूर्वक बँकेकडे सादर करणे आवश्यक आहे.
यावेळी एमआरसेटीच्या प्रशिक्षक श्रीमती श्रद्धा दुधे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार, कर्वे संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक महेश ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कर्वे संस्था समाजकार्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक महेश ठाकूर, समाज कल्याण अधीक्षक नंदकुमार राणे आदींसह स्वयंसहाय्यता युवा गटातील युवक- युवती, लघु उद्योजक, विद्यार्थी उपस्थित होते.