Type Here to Get Search Results !

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत रंगला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

मुंबई: सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. आज गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्षे सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झाले. या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करुन महाराष्ट्राला पुढे नेणारे कलाकारच आपले कोहिनूर असून महाराष्ट्र ही अशा कोहिनूरची खाण आहे. आतापर्यंत ४८ भारतरत्न दिले असून यापैकी १० भारतरत्न महाराष्ट्राला मिळाले आहेत. दरवर्षी देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारामध्ये १० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळतात यावरुन महाराष्ट्रात असलेल्या सांस्कृतिक वैभवाची प्रचिती येते. नुकतेच राज्य शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारले असून या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र आपल्या कलेच्या माध्यमातून सिद्ध करेल. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करताना साहित्य, रंगभूमी, कला, चित्रपट यामुळे प्रेक्षकांना समाधान कसे मिळेल याकडे लक्ष देत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर कसा येईल याकडे लक्ष देण्यात येत असून आपल्यापैकी कोणाकडे काही याबाबत सूचना असल्यास कळवाव्यात.

            प्रास्ताविक करताना श्री. खारगे यांनी येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध क्षेत्रातील कला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावर्षी या विभागामार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

साहित्य संमेलनासाठी ५० लाख नाही, तर २ कोटी रुपये अनुदान

            मंत्री श्री. केसरकर यावेळी म्हणाले की, कला आणि साहित्य यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून हे राज्य शासन प्रयत्न करत आहे. उद्यापासून साहित्य संमेलन सुरु होत असून या संमेलनासाठी ५० लाख ऐवजी २ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय येणाऱ्या काळात मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी ५०० आसनी ॲम्पी थिएटर असणार आहे. नवी मुंबई येथील जागेत मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांची निवासाची सोय केली जाणार आहे. यशिवाय वाई येथे विश्वकोश इमारत उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग येथे यापूर्वी ३ नाट्यगृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून चौथ्या नाट्यगृहाचे भूमीपूजन लवकरच केले जाईल.

रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

            भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचित्र, सन्मानपत्र असे आहे. याच कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. १ लाख रुपये रोख, मानचित्र, सन्मानपत्र देऊन यावेळी मान्यवरांना गौरविण्यात आले. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

            सन 2020 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पद्मभूषण डॉ.एन. राजम यांना प्रदान करण्यात आला. सन 2021 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला होता. पद्मविभूषण पंडित शिवकुमार यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी मनोरमा शर्मा आणि मुलगा राहुल शर्मा यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

            सन 2019-20 चा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला होता. पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रतिभा रत्नाकर मतकरी यांनी स्वीकारला. सन 2020-21 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दत्ता भगत यांना, तर सन 2021-22 चा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

            सन 2019-20 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना, सन 2020-21 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना, तर सन 2021-22 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना प्रदान करण्यात आला.

            याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी सन्मान करण्यात आला. सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वाद्य निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात आला. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसूत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाठी पं.रवींद्र अतिबुध्दी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी भूषण लकिंद्रा यांचा सत्कार करण्यात आला. सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथ्थक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सितारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरकारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

            पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. आज 2 फेब्रुवारी रोजी बेगम परवीन सुलताना आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन झाले. शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर, सानिया पाटणकर, विराज जोशी यांचे गायन होणार आहे. तर पं. उद्धव आपेगांवकर आणि पं. पुष्कराज कोष्टी यांचे वादन होणार आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी पं. राजा काळे, डॉ. आशिष रानडे आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन, तर वि. कला रामनाथ यांचे वादन होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test