ऊसतोड कामगार महिलांच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने विचार करावा - कल्याणी वाघमोडे
जागतिक महिला दिनी छत्रपती साखर कारखाना येथे महिलांचा सन्मान ,आरोग्य विषयक मार्गदर्शन
भवानीनगर - आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांति शौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी ऊसतोड कामगार महिलांचा सन्मान करून त्यांना डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य विषयक मार्गदर्शन देऊन कार्यक्रम उत्साहात संपन्न केला .
यावेळी सर्व ऊसतोड कामगार महिलांना खण नारळाने ओटी भरून हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.यावेळी सॅनिटरी पॅड्स महिलांना देऊन महत्व पटवून दिले . तसेच डॉक्टर शुभांगी सपाटे व डॉक्टर तनुजा शितोळे यांनी आपले आरोग्य कसे सांभाळावे ,ऍनिमिया ची कारणे ,पोषणयुक्त आहार ,मासिक पाळीत होणाऱ्या अडचणी ,स्वच्छता,गर्भाशय कॅन्सर व महिलांनी वेळेच्या पूर्वी गर्भाशय न काढता पुढील शारीरिक हानी पासून स्वतःला वाचवावे व सुखी आरोग्यदायी आयुष्य जगावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
कल्याणी वाघमोडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष्य केले . देशातील जवळपास 40% साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत साखर उद्योगाचा हा डोलारा ऊस उत्पादक शेतकरी व ऊसतोड मजूर यांच्यावर उभा आहे .महाराष्ट्राच्या मराठवाडा तसेच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही दुष्काळग्रस्त भागातून उत्तर कामगार ऊस उत्पादक भागांमध्ये स्थलांतरित होत असतात.
*आज पर्यंतच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे आणि ही दुःखदायक बाब आहे की साखर कारखाने या ऊसतोड कामगारांची जबाबदारी घेण्यात किंवा त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे समर्थ ठरलेले नाहीत. कामगार हे उसाच्या वाड्यापासून तयार केलेल्या तात्पुरत्या झोपडी मध्ये राहतात. तिथे स्वच्छता विषयक साधने आणि पुरेशा पाण्याची ही सोय नसते . स्नानगृह किंवा शौचालय यासारख्या मूलभूत सुविधाही अनेक ठिकाणी नसतात . महिला मासिक पाळीतील स्वच्छतेची संबंधित गोष्टी करू शकतील, अशा कोणतीच व्यवस्था नसते त्यामुळे मासिक पाळी बद्दल आपण कितीही व्यापकपणे बोललो तरीही ऊसतोड कामगार महिला त्यापासून खूप दूर आहेत हे मान्यच करावे लागेल. ऊसतोड करणाऱ्या महिलांना खूप कष्ट करावे लागतात ,त्यांना उसाच्या मोळ्या बांधून उचलाव्या लागतात किंवा पडेल ते जड काम करावे लागते. प्रसूती नंतर किंवा मासिक पाळीच्या दुखण्यामध्ये ही विश्रांती मिळत नाही. महिलांना गैरसोयीत आणि असुरक्षित राहून काम करावे लागते .या कामात त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही .त्यामुळे त्यांना कंबर, ओटीपोटी दुखणे, अंगावरून जाणे. मासिक पाळीचे आणि इतर बरेच आजार होतात आणि वेळप्रसंगी त्या वयाच्या 40 वर्षाच्या आतच गर्भाशयाची पिशवी काढणे या उपायावर येऊन थांबतात ही गंभीर बाब आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने "एक नवीन साडी कमी घ्या परंतु मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन वापरा .असे आवाहन कल्याणी वाघमोडे यांनी केले .*
महाराष्ट्रात ऊस तोडणीच्या कामातला महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीचा दिसून येतो ,मात्र या कामामुळे महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो 2019 च्या नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार महिला ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले होते .खास करून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामधील गर्भाशय पिशवी काढण्याचे प्रमाण जास्त आढळून आले होते. महिला ऊसतोड कामगारांमधील गर्भाशय काढण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा असला तरी त्यावर तोडगा काढता येऊ शकतो .त्यासाठी या महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत देणे, साप्ताहिक सुट्टी देणे किंवा मासिक पाळीतील आजारांवर कामाच्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवणे आणि याबाबत महिलामधे जनजागृती करणे इत्यादी पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो .ऊस तोडणी साठी जाणाऱ्या प्रत्येक महिलेला आरोग्यकार्ड देणे ,ऊस तोडणी ला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर महिलांचे आरोग्य तपासणी करणे. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ऊस तोडणीच्या ठिकाणी महिलांची वैद्यकीय तपासणी करणे ,या गोष्टी होणे गरजेचे आहे. आरोग्यासाठी ऊसतोड मजुरांना हेल्थकार्ड देण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी. या कार्डावर मजुराच्या आरोग्य तपासणीची नोंद, महिला कामगारांना गरोदरपण, बाळंतपणामध्ये देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची नोंद असावी .ऊसतोड कामगारांचा अपघात आणि आरोग्य विमा काढण्यासाठी राज्य सरकारने कारखाना, मालक आणि कंत्राटदार यांना तशी सक्ती करावी.
*सरकारने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे. त्याचे उद्घाटन 3 एप्रिल 2022 ला झाले. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात यावा, यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षा निश्चितपणे मिळतील आणि यासाठी यंत्रणा उभी करणे ही आवश्यक बाबींचा ,मागण्यांचा विचार शासनाने करावा ,असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले आहे.*
यावेळी ऊसतोड कामगार महिला विजया येवले ,सरस्वती सांगळे ,आशाबाई जाधव ,कौशल्या पवार ,मनीषा मिसाळ यांनी महिलांना येणाऱ्या अडचणी बाबत मन मोकळे केले .
तसेच या कार्यक्रमात महिला सदस्या सुरेखा शिंदे ,प्रहारच्या तालुका उपाध्यक्ष सुकशाला ढाणे , संगीता चट्टे ,निकिता शिंदे ,आफरी मणियार ,सिंधू जाधव ,बबई चट्टे ,लक्ष्मी माने यांनी सहभागी होत कार्यक्रम पार पाडला .