Type Here to Get Search Results !

बारामती तालुका पर्जन्यमान, पिक पेरणी व खरीप हंगामातील पीक नियोजन

बारामती तालुका पर्जन्यमान, पिक पेरणी व खरीप हंगामातील पीक नियोजन
पुणे : बारामती तालुक्यात जून महिन्यात आतापर्यंत ८७.१० मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ११.३ मि. मी. म्हणजे सरासरीच्या १३ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १९ हजार ४९२ हेक्टर असून आतापर्यंत ३९५.८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली आहे.

हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (न्यू नॉर्मल मान्सून पिरीयड) हा २४ ते २५ जून असेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. 

*योग्य पीक नियोजन*
या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशीरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करु नये. पेरणीसाठी साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.

त्याप्रमाणे जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन सारख्या तंत्राचा वापर करावा. हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषि विद्यापीठ, कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. 

क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषि विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीच्यावेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. 

खरीप हंगामातील पीक नियोजनाची शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेवून  पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करु नये, असे आवाहनही कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test