Baramati जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन
बारामती : जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व संबंधित विभागप्रमुखासोबत कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीचे तहसील कार्यालय येथे आयेाजन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, तुषार गुंजवटे, निरीक्षणाधिकारी लक्ष्मण माने आदी उपस्थितीत होते.
तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, जेजुरी येथे सोमवार ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे २ हजार लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येणार असून त्यासाठी ५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना भोजन, पिण्याचे पाणी, वाहनाची व्यवस्था आदी मूलभूत सेवा पुरविण्यात याव्यात.
गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्यामार्फत लाभार्थ्यांना निमंत्रण पाठविण्याची व्यवस्था करावी. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांनी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे चोखपणे कामे करावीत, अशा सूचनाही तहसीलदार श्री. शिंदे यांनी दिल्या.