Type Here to Get Search Results !

लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम...जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन

लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम...जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन
पुणे - पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम ८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून सर्व विभागांनी लोकसहभाग व श्रमदानातून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात वनराई बंधारे बांधण्याबाबत आयोजित बैठकीत डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, रोजगार हमी योजना शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील, जिल्ह्यातील उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.

जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. काही गावात पावसाचे प्रमाण चांगले असूनही पाणी साठवणूक न झाल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक तालुक्याने ८ सप्टेंबर पासून वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्रे, लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडविले जाऊन भूजल पातळीत वाढ होते आणि सक्षम जलस्रोतांची निर्मिती होते. कमी पर्जन्यमान असलेल्या भागात पावसाच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग अशा बंधाऱ्यांमुळे करता येतो. गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊन पशुधनालाही या पाण्याचा उपयोग होतो. बंधाऱ्यांची साखळी निर्माण केल्यास विहिरीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

बंधाऱ्यासाठी जागा निवडताना कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त पाण्याचा साठा करणे शक्य होईल अशी जागा निवडावी. नाला अरुंद व खोल असावा तसेच साठवण क्षमता पुरेशी असावी. तसेच नाल्याच्या तळाचा उतार ३ टक्के पेक्षा कमी असावा. बंधाऱ्याची उंची जास्तीत जास्त १.२० मीटर एवढी असावी. निवडलेली जागा प्रवाहाच्या वळणाजवळची असू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.


वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करताना प्रवाहाचा उतार व रुंदी लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या पायथ्याची रुंदी १.५ ते २.५ मीटर असावी. हा बंधारा दोन्ही काठापर्यंत बांधावा. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये रेती, वाळू भरुन त्यांची तोंडे प्लास्टिकच्या दोऱ्यांनी शिवून बंधाऱ्यासाठी वापरण्यात यावेत. प्रवाहाच्या वाहण्याच्या दिशेस आडवा अशी बंधाऱ्याची रचना असावी. पहिला थर तयार झाल्यावर तसाच दुसरा थर रचण्यात यावा. विटांची भिंत बांधताना वापरण्यात येणारी सांधेजोड पद्धत यात वापरण्यात यावी. साधारणत: दोन अथवा तीन थरानंतर मातीचा थर पसरविण्यात यावा, त्यामुळे रचलेल्या पोत्यांच्या मधील फटी बुजून बंधाऱ्यांचे सांधे पक्के होतात व पाणी झिरपत नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test