Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी...शासकीय इमारतीचे नियोजन करताना सौर पॅनलचा समावेश करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी...
शासकीय इमारतीचे नियोजन करताना सौर पॅनलचा समावेश करण्याचे दिले निर्देश

बारामती : आगामी काळातील विजेची गरज लक्षात घेऊन यापुढे तालुक्यातील प्रत्येक नवीन शासकीय इमारतीचे नियोजन करताना त्यामध्ये सौर पॅनेलचा समावेश करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती परिसरातील मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालय, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निर्यात केंद्र व कार्यालयीन इमारत, जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कालव्याचे सुशोभीकरणाची सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या.

मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बाजूला होणाऱ्या चौपदरी महामार्गाचे काम लक्षात घेता सेवा रस्त्याची कामे करावीत. याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात अधिकाधिक  सुविधा मिळतील यादृष्टीने  कामे करावीत. विशेषत: वसतीगृहात अत्याधुनिक पद्धतीची आणि पाणी वाचविणारी शौचालये, वॉशबेसिन, शॉवर बसवावीत. वीज केंद्रात बाजूच्या नदीचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी. आयुर्वेदिक महाविद्यालय परिसराला शोभेल असे काम करा. या परिसरातील स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. 

नवीन प्रशासकीय भवन शेजारी उभारण्यात येणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे काम वेळेत पूर्ण करावे. इमारतीचा परिसर स्वच्छ करुन घ्यावा. नवीन कारागृहाची कामे लवकरात लवकर सुरु करावीत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीचे काम शैक्षणिक क्षेत्राला शोभेल असे आणि ग्रंथालयात पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन करा. विद्यार्थ्यांनाअधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे करावीत. 
जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे मजबूत आणि पुरेसे उंच बनवावे. संचालक मंडळाच्या कार्यालयात बैठक व्यवस्था पुरेशी असेल  अशी तरतूद करावी. कृषी उत्पन्न बाजार समिती निर्यात केंद्राच्या दर्शनी भागात आंबा, डाळींब, द्राक्ष, पेरु आणि केळी फळाची छायाचित्रे लावावीत. जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉल सुशोभीकरणाच्या परिसरात जनावरे, पाळीव प्राणी येणार नाही, यासाठी प्रवेशद्वाराजवळ फाटकांची व्यवस्था करावी, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

*मुदतीत मिळकत कर भरणाऱ्यांसाठी बक्षिसांची योजना राबवा*
पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी लॉटरी योजना राबवून विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्याप्रमाणे बारामती नगरपरिपरिषदेनेही कार्यवाही करावी, असे निर्देशही श्री.पवार दिले.

इमारतींच्या परिसरात स्वच्छता ठेवावी आणि  विविध जातींच्या वृक्षारोपणावर भर द्यावा. सार्वजनिक विकासकामांसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय उपसंचालक विश्वास गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, सचिव अरविंद जगताप, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, अभिजित जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदी उपस्थित होते.
0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test