सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न
अभ्यासामध्ये सातत्य व परिश्रम आणि घरच्यांचा पाठिंबा यामुळेच हे यश संपादन नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या मयुरी महादेव सावंत यांचे मनोगत
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या मयुरी महादेव सावंत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सतीशराव लकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप, तसेच मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मयुरी सावंत हिचा सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या मनोगत मध्ये त्या म्हणाल्या की, अभ्यासामध्ये सातत्य व परिश्रम आणि घरच्यांचा पाठिंबा यामुळेच हे यश संपादन केले असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने आपले ध्येय एकदा ठरवले की ते पूर्ण करण्यासाठी मनोमन प्रयत्न केला पाहिजे, आणि जिद्द चिकाटी असेल व घरच्यांचा पाठिंबा असेल तर यश निश्चित मिळते. असे विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर यांनी पालक आणि महाविद्यालय यामध्ये संवाद होणे महत्त्वाचे असून म्हणूनच पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये जास्त संख्येने महिला पालक उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयामधील शिस्त, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, उपलब्ध सोयी सुविधा याविषयी विचार मांडले, तसेच विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती ही कौतुकास्पद असून, त्याचे श्रेय विद्यार्थी व शिक्षक यांचे आहे. त्यामुळे त्यांचे ही अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांचा विविधाअंगी विकास व्हावा म्हणून महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करीत आहे व यातून अनेक विद्यार्थी ही विविध क्षेत्रांमध्ये करिअर करीत आहे हे त्याचेच फलित आहे असे आवर्जून सांगितले.
यावेळी अनेक पालकांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये श्री. कांचन निगडे यांनी महाविद्यालया च्या प्रगतीचे कौतुक करून, प्राचार्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाचा विकास होत आहे असे यावेळी सांगितले, तसेच भविष्यात महाविद्यालयाकडून अनेक अपेक्षा आहेत व काही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य रवींद्र जगताप यांनी केले, यामध्ये त्यांनी सर्व पालकांचे स्वागत करून, बोर्ड परीक्षा संदर्भात विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पालक शिक्षक संघाचे समन्वयक प्रा.दत्तराज जगताप यांनी केले.