तक्रार आल्यास बियाणे विक्री केंद्राचे परवाने निलंबित करण्यात येणार- उपविभागीय कृषि अधिकारी सुप्रिया बांदल
पुणे- बारामती, पुरंदर, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील कृषी सेवा केंद्राविरुद्ध रासायनिक बियाणे, खते व किटकनाशकाच्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली आहे.
रासायनिक बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करण्याकरीता शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गेल्यास विक्रेते युरिया व इतर खते शिल्लक नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. युरिया खतासोबत इतर खते व उत्पादनांचा साठा करुन शेतकऱ्यांना खरेदी करण्यास भाग पाडत आहेत, अशा स्वरुपाच्या तक्रारी भ्रमणध्वनीव्दारे प्राप्त होत आहेत. शासनाने युरिया व इतर रासायनिक खतांचा तालुकानिहाय पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीतच निविष्ठा खरेदी कराव्यात. खरेदी केलेल्या निविष्ठांची पक्की देयके घ्यावीत.
शेतकऱ्यांना खते, बियाणे, किटकनाशके अशा कोणत्याही निविष्ठांसोबत अन्य निविष्ठांची सक्ती करणे, निविष्ठा उपलब्ध असतानाही नाकारणे, जादा दराने विकणे, पावती न देणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुराव्यासह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ९१५८४७९३०६ या जिल्हास्तरावरीय व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करावी, केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबन, विक्री बंद आदेश, परवाने रद्द आदी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती श्रीमती बांदल यांनी दिली आहे.