Type Here to Get Search Results !

दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरविण्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालानंतर धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

            दौंड येथील विविध विकासात्मक कामासंदर्भात आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी आमदार श्री. कुल, आमदार जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह दौंड तालुक्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            खडकवासला धरण ते फुरसुंगी-लोणी काळभोरपर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास मंजुरी देणे.जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत स्थापन केलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून, धोरण निश्चित करणे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. हे विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता व मंत्रिमंडळ मान्यता मिळणे तसेच राज्यातील चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनी निर्मूलनासाठी सुधारित धोरण निश्चित करून दौंड तालुक्यातील कामांना मान्यता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

            यवत येथील सिटी सर्व्हे ५५० व ५७४ मधील जलसंपदा विभागाच्या नावे असलेल्या १ हे. ३० आर क्षेत्रापैकी १ हे. क्षेत्र यवत पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत बांधकामाकरिता पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगून दौंड तालुक्यातील एमएसईडीसीएल (MSEDCL) च्या विविध समस्या आणि मागण्यांकरिता ऊर्जा सचिवाना सूचना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test