सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांतर्गत श्रीक्षेत्र मोरगाव देवस्थानासाठी २ कोटी ४६ लाख रुपये, तर श्रीक्षेत्र करंजे सोमेश्वर देवस्थानसाठीही 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र विकासांतर्गत १ कोटी २८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
दोन्ही देवस्थानांस ग्रामविकास विभागाकडून निधी मिळण्यासाठी देवकाते यांनी पत्रव्यवहार केला होता आणि त्यांच्या पाठपुरव्यास यश आले. ग्राम विकास विभागाकडून श्री मयूरेश्वर गणपती देवस्थानास २ कोटी ४६ लाख रुपये, तर श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे देवस्थानास १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. हा निधी मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे सहकार्य लाभले.