बारामती : बारामती तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पारडं जड होताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील गुणवडी येथील असंख्य मुस्लिम बांधव व महिला भगिनींनी अजितदादांना पाठींबा जाहिर करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजितदादांच्या समन्यायी नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं निष्ठापूर्वक काम करण्याचा निर्धार मुस्लिम बांधवांनी केला आहे.
बारामती तालुक्यातील गुणवडी येथे अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ ना. अजित पवार यांच्या भगिनी डॉ. रजनी इंदुलकर यांनी ग्रामस्थांची भेट घेतली.. यावेळी गुणवडीतील मुस्लिम बांधवांसह महिलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत अजितदादांना पाठींबा जाहिर केला. आम्ही सर्वजण अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणार आहोत असं यावेळी मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आलं.
राज्यात जातीपातीचं राजकारण न करता सर्व समाज घटकांना सोबत घेवून कार्यरत असणारे अजितदादा हे एकमेव नेते आहेत. अल्पसंख्यांक समाजाला प्रत्येक अडचणीच्या वेळी अजितदादांची साथ लाभली आहे. त्यामुळं यापुढील काळात सदैव अजितदादांना खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉ. रजनी इंदुलकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांचं स्वागत करत राष्ट्रवादीत काम करणाऱ्या प्रत्येकालाच सन्मानाची वागणुक मिळेल अशी ग्वाही दिली. बारामतीसह राज्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी अजितदादांना विक्रमी मताधिक्यानं निवडून देवून त्यांचे हात बळकट करावेत असं आवाहनदेखील डॉ. इंदुलकर यांनी केलं.