बारामती प्रतिनिधी(विनोद गोलांडे)-बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इं. मि.स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार, दि. ३० जानेवारी २०२५ आणि शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ असे दोन दिवस हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम शाळेचे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
गुरुवारी पूर्व प्राथमिक विभागाने Nursery, LKG, HKG आणि इ.१ली आणि २री मधील विद्यार्थ्यांनी 'Sparkling Jollies of the Wonderland' हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमासाठी बारामतीतील प्रसिद्ध उद्योजक श्री.संजय संघवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच समीर वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष श्री. अश्पाक सय्यद, आणि शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री. पी.बी. कुलकर्णी यांची सन्माननीय उपस्थिती कार्यक्रमास लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाचे बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॕडमिन हेड श्री. आशिष केंडे आणि सहशिक्षिका सौ.प्राची नाईक यांनी केले.
छोट्यांच्या दुनियेतील Wonderland मधील गोड एलीस (स्वरा वाडेकर) आणि खोडकर मार्च हेअर (युग कोथिंबीरे) या दोन पात्रांनी त्यांच्या संवादातून Nursery Rhymes, विविध गाणी, बालगीते, भाज्यांचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या नाटिका, कोळीगीत, शेतकरी गीत, भारत देशाची विविधतेतील एकात्मता दर्शविणारे गीत असे अनेक कार्यक्रम उलगडत नेले. त्यांना उन्नती गावडे, परिणीती गाढवे, प्रियल काटे आणि अधिराज जाधव या विद्यार्थ्यांनी त्यांना साथ दिली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या कार्यक्रमास पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि.३१/०१/२०२५ रोजी शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाने 'गीत रामायण' अभिनय आणि नृत्यातून सादर केले. श्रीराम यांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांनी आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून गायलेल्या गीत रामायणातील गाण्यातून उलगडून दाखविला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म.ए.सोच्या नियामक मंडळाचे सदस्य, शाळेचे महामात्र मा. डॉ.गोविंद कुलकर्णी उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री.पी.बी. कुलकर्णी, म. ए.सो.च्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे, म.ए.सो.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मोनिका खेडलेकर, कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रोहिणी गायकवाड आणि श्री. दीपक पेशवे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा पुणे चे संघचालक), महान्यूज चे पत्रकार श्री.वरे हे विशेष अतिथी तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.राधिका कोठाडिया यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना शाळेचे महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी विद्यार्थीदशेत मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व विशद करत पालकांशी संवाद साधला. शाळेच्या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत स्वभाषेसोबत इतर भाषांचा अभ्यास शाळेतूनच होण्याची आवश्यकता पटवून दिली. यानंतर शाळेच्या इ.३ री ते इ.१० विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा पार पाडला.
सांस्कृतिक कार्यक्रम आजी व नातवाच्या संवादातून सुरू होऊन अयोध्येतील राम मंदिर उभारणीस वर्षपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजी आपल्या नातवास गीत रामायणातून प्रभू श्रीरामांचा जीवनपट दाखवते. कार्यक्रमाची सांगता 'शुद्धब्रह्म परात्पर राम' या संगीतिकेने झाली. सर्वच गाण्यांना पालकांनी भरघोस टाळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
सदर स्नेह संमेलने नियोजनबद्ध होण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर, मएसो नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री.राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.पी.बी.कुलकर्णी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.