Type Here to Get Search Results !

बारामती ! गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदे

बारामती ! गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदे
बारामती : आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आदींनी मिळून गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे निर्देश पंचायत समिती सभागृहात आयोजित तालुका आपत्ती प्राधिकारणाची मान्सूनपूर्व आढावा बैठकीत तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी दिले.

यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक गट विकास अधिकारी नंदन जरांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, विस्तार अधिकारी भीमराव भागवत यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


श्री. शिंदे म्हणाले, आपत्तीच्या काळात प्रशासनाच्यावतीने दिलेला तात्काळ प्रतिसाद नागरिकांना दिलासादायक असतो. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच जीवितहानी टाळण्यासोबतच गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे.त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन   आपत्कालीन यंत्रणा सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी. संबंधित विभागाने तालुकास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. त्याबाबतची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सादर करण्यासोबतच माहिती नागरिकांनाही द्यावी. 

 
पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना वेळेत मिळेल याबाबत नियोजन करावे. कालवा परिसरात नागरिकांची होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने फलके लावावीत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावे आदीबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना माहिती द्यावी. धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
आपत्तीच्यावेळी उपयोगात येणारी बुलडोझर्स, वॉटरटँकर्स, डंपर्स, अर्थमुव्हर्स, डिवॉटरींग पंप्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, फल्ड लाईट, आर.सी.सी.कटर्स, इत्यादी साहित्याची चालू स्थितीमध्ये असल्याबाबत याची खात्री करुन घ्यावी.

आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुक्यातील रुग्णालये, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.

श्रीमती पाटील म्हणल्या, आपत्तीच्या काळात घडलेल्या घटनेबाबत प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी. पोलीस प्रशासनाच्यावतीने आपत्तीच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्रीमती पाटील म्हणाल्या.


यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीबाबत माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test