विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथग्रहण सोहळा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाघळवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२५- २६ साठीच्या नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथग्रहण सोहळा दिमाखात पार पडला.
तत्पूर्वी एप्रिल महिन्यात इच्छुक विद्यार्थी प्रतिनिधींनी लोकशाही निवडणूक पद्धतीप्रमाणे अर्ज भरणे, समर्थक गोळा करणे, प्रचार करणे अशा सर्व प्रक्रियांची पूर्तता केली.
इयत्ता ६ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने मतपत्रिकेवर मत नोंदवत आपला विद्यार्थी प्रतिनिधी निवडला. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्वराज काकडे व विद्यार्थिनी प्रतिनिधी स्वराली भापकर यांची निवड झाली व आज सर्व प्रतिनिधींना गोपनीयतेची शपथ देत त्यांच्या औपचारिक कार्य काळाची सूत्रे सोपवण्यात आली. मुलांना लोकशाही पद्धतीची ओळख करून देणे तसेच शाळेच्या व्यवस्थापनात प्रत्यक्ष सहभाग घेता यावा. शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या शाळेच्या प्रशासनाकडे मांडता याव्यात यासाठी मुलांना हा मंच तयार करून देण्या मागचा मुख्य हेतू असतो.
यावेळी शाळेतील इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वीचे विद्यार्थी ,शिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख सचिन निंबाळकर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कर्णवर यांनी केले.