हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये टाळ-मृदुंग विठूच्या गजरात विद्यार्थ्यां पायी दिंडी.
बारामती प्रतिनिधी (मुख्य संपादक विनोद गोलांडे)
ज्येष्ठ महिना येतो तोच आषाढवारीची नांदी घेऊन! पंढरपुराच्या विठुमाउलीच्या दर्शनाची आस घेऊन लाखो वारकरी शिस्तबद्ध पाऊले चालत पंढरीची वाट धरतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना ओढ लागते ती शालेय दिंडीची... पालखी सोहळ्याची. सालाबादप्रमाणे या वर्षी आपल्या शाळेचा पालखी सोहळा शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी टाळ-मृदुंग आणि विठूच्या गजरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीने साजरा झाला.
बारामतीच्या अशोकनगर परिसरातील श्री गणेश मंदिराच्या परिसरात सकाळी पारंपरिक वारकरी वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्तींचे तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांची दिंडी निघाली. या दिंडीमध्ये प्राथमिक विभागाचे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी, विविध संत यांच्या पोषाखामध्ये सामील झाले होते. विद्यार्थ्यांनी हातामध्ये टाळ, तुळशी वृंदावन, भागवत पताका, दिंडीचा नाम फलक असे पारंपरिक साहित्य त्याचसोबत सामाजिक उद्बोधन करणारे घोष फलक घेतले होते. परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना आपल्या विद्यार्थ्यांनी सीडबॉल, झाडांची रोपे आणि संस्कृतीमूल्य जपणारी पुस्तके वाटून याच कार्यक्रमात वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी प्रत्यक्षात राबविली. या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे कौतुक केले.
यानंतर विद्यार्थी दिंडी पुन्हा एकदा श्री गणेश मंदिरातील परिसरात आली. येथे उपस्थित दांपत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या दैनिक परिपाठाने मंदिराचे वातावरण भारावून गेले. तद्नंतर विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी संतांच्या अभंगांचे सादरीकरण केले. आता वेळ होती ती दिंडीतील रिंगण सोहळ्याची आणि वारकऱ्यांच्या विविध खेळांची. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" आणि इतर अभंगांच्या साथीने विद्यार्थ्यांनी इयत्तेनुसार वारी मधल्या खेळांचा आनंद विद्यार्थी मित्रांनी केलेल्या रिंगणामध्ये लुटला. विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये हलकीशी पर्जन्यवृष्टी आल्हाददायक वाटून गेली. विद्यार्थी पालक व शिक्षक यांचा "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठ्ठल...." हा जयघोष अत्यंत रोमांचित करणारा वाटला. यावेळी पालकांनी जागेवर उभे राहून विद्यार्थ्यांसोबत ताल व ठेका धरल्याने अवघा परिसर विठूमय होऊन गेला. अशा या सुंदर कार्यक्रमाचे सांगता पसायदान आणि प्रसाद वाटपाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. पुनम कोठावळे यांनी तर आभार प्रदर्शन दिपाली पवार यांनी केले.
शाला समितीचे अध्यक्ष.अजय पुरोहित सर, शाळेचे महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर आणि मएसो नियामक मंडळ सदस्य .राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य.पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.