बारामती : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘महाविस्तार AI’ मोबाईल ॲपवरील कृषी विषयक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
मोबाईलवरील ‘महाविस्तार AI’ हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सहाय्यक म्हणून काम करते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या ॲपमुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रश्नांची जलद, अचूक आणि मराठी भाषेत माहिती मिळते. हवामान अंदाज, बाजारभाव, पिक व्यवस्थापन, रोग-कीड निदान, सरकारी योजना अशा अनेक महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
*AI चॅटबॉटमुळे शेतकरी मराठीत प्रश्न विचारू शकतात (मजकूर, आवाज स्वरूपात), तत्काळ वैज्ञानिक व विश्वसनीय सल्ला मिळतो. रिअल-टाइम हवामान अंदाज व पेरणी, सिंचन, काढणी यासाठी तंतोतंत माहिती मिळते.
राज्यातील विविध बाजारभावांचे माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी योग्य वेळ निवडण्यास मदत होते. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, संरक्षण उपायाबाबत मार्गदर्शन व सल्लाही मिळतो.
पिकाचा फोटो अपलोड केल्यानंतर रोग,कीड, पोषण अभावाबाबत माहिती तसेच त्यानुसार उपाययोजना शेतकऱ्यांना सूचविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अनुदान, विमा, कृषी विभागाच्या योजनांचे संपूर्ण शासकीय योजनांची माहिती मिळते. शेतीविषयक मार्गदर्शक व्हिडिओ मराठीत माहितीपूर्ण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी, प्रगतशील शेतकरी व तज्ज्ञांशी संवादाची सोय देखील उपलब्ध आहे.
'महाविस्तार AI’ ॲप डाउनलोड करण्याकरिता
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai या लिंकवर क्लिक करावे, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा



