सोमेश्वरनगर - संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने मांडकी (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटपून मंगळवारी निरा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दुपारचा विसावा घेतला. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या दरम्यान पालखी सोहळ्याचे निंबूत नगरीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. "ज्ञानोबा-तुकाराम", "सोपानकाका महाराज की जय" अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सोमेश्वरनगर - संतश्रेष्ठ सोपान काका महाराज पालखीचे स्वागत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीराव काकडे, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती प्रमोद काकडे, निंबूतचे सरपंच काळे, उपसरपंच अमरसिंह काकडे, माजी उपसरपंच उदयसिंह काकडे, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष गौतम काकडे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय काकडे, मदन काकडे,विजयराव काकडे, राजकुमार बनसोडे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन मोहिते सह पोलीस कर्मचारी, पंचायत समितीचे प्रशांत इंगोले, नामदेव काळे, नायब तहसीलदार प्रमिला लोखंडे, मंडळ अधिकारी रोहित वाघचौरे, महसूल विभाग, महावितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, रथासमोर २७ तर रथामागे तब्बल ९३ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही निंबूतकरांनी वारकऱ्यांच्या राहण्याची, भोजनाची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची व इतर सर्व आवश्यक सुविधांची अत्यंत चोख व्यवस्था केली असून, गावातील प्रत्येक घरातून सेवाभावाचे दर्शन घडत आहे.
बुधवार, दि. १५ जुलै रोजी पालखी निंबूत येथील मुक्काम आटपून यशवंतनगर , वाघळवाडी येथे विसावा घेणार आहे. त्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजता मु.सा .काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पारंपरिक पहिले अश्व गोल रिंगण रंगणार असून, सायंकाळी सुमारे ५ वाजता पालखी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पालखीस्थळी विसावणार आहे. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी असते.
यंदा वारकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली असून, सेवेलाच देव मानणाऱ्या निंबूतकरांनी प्रत्येक वारकऱ्याच्या निवास, भोजन व सोयी-सुविधांची अत्यंत चोख व्यवस्था केली आहे. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा हा अद्वितीय संगम निंबूत नगरीत अनुभवायला मिळत आहे."



